नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाला. ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत, तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला, असे खळबळजनक विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला होता. मलिक यांनी आता आपल्या विधानावरुन सारवासारव केली आहे.
मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे संबंध अतिशय चांगले आहेत, शहा यांनी मोदींबाबत काहीही विधान केले नाही. शहांनी मोदींबद्दल केलेल्या विधानाच्या, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असेही मलिक यांनी म्हटले. दरम्यान, सत्यपाल यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर, मोदींना काही लोकांनी चुकीची माहिती दिली आहे, आपण त्यांना भेटत जावे, एकदिवस त्यांना सर्वकाही समजेल, असे अमित शहांनी बोलताना म्हटल्याचे मलिक यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी युटर्न घेतला आहे.
मलिक यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. या भेटीनंतर काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय. जेव्हा मी त्यांना भेटलो. तेव्हा ते खूप हट्टीपणा दाखवत होते. पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून मी अमित शाह यांना भेटलो. अमित शाह पंतप्रधान मोदींचा खूप सन्मान आणि आदर करतात, असे म्हणाले.
मोदींना भेटायची हिंमत झाली नाही
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत झालेल्या प्रकारानंतर पुन्हा त्यांना भेटायची माझी हिंमत झाली नाही. तुम्ही आमच्यासाठी योग्य व्यक्ती नाही, असे मला सांगितले असते, तर एका मिनिटात राज्यपालपद सोडले असते. तशी मनाची तयारी मी केली होती, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांचे गावागावांमध्ये जाणे कठीण झाले होते. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात कोणताही मंत्री जाऊ शकत नव्हता. तेथील जनता पंतप्रधानांचा खूप आदर करते, ही बाब वेगळी आहे. मात्र, हरियाणामध्ये तर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही.