नवी दिल्ली - मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भाजपला अडचणीत आणणारं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गहू एक्सपोर्टची गोष्ट करतात, गहू काय पीएम मोदींचा आहे का?, असा सवाल मलिक यांनी केला आहे. तसेच, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे मोदींचे दोस्त असल्याचेही त्यांनी म्हटले. हनुमानगढच्या संगरिया येथील एका कार्यक्रमासाठी मलिक आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी असताना कोट्यवधी रुपयांच्या लाच देण्याच्या ऑफर आल्या होत्या. यासंदर्भात सीबीआयने विचारणा केल्यास मी लाचेची ऑफर देणाऱ्यांची नावे सांगेल, असा इशाराच सत्यपाल मलिक यांनी दिला. तसेच, ही बाब मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितला तेव्हा मोदींनी माझं समर्थन केलं. भ्रष्टाराच्या बाबतीत कुठलिही तडजोड होता कामा नये, असे मोदींनी म्हटल्याचे मलिक यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात भाजपला जिंकून देण्यासाठी बसपने मोठी मदत केली. भाजप स्वबळावर निवडणूक जिंकत नव्हती, असा गौप्यस्फोटही मलिक यांनी केला आहे. तसेच, शेतकरी आंदोलन पुन्हा होणार आहे, एमएसपी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी, शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरतील, कारण सरकार एमएसपीबाबत डावं-उजवं करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
इंधनाचे दर कमी करा
पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले पाहिजेत. तरच, सर्वसामांन्याना दिलासा मिळेल, असेही मलिक यांनी म्हटले.
मलिक यांनी यापूर्वी मोदींवरही साधला होता निशाणा
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. तसेच कृषी कायद्यासह अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर मलिक सातत्याने निशाणा साधतानाही दिसत आहेत. यापूर्वी जोधपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना थेट टक्कर देऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते.