नवी दिल्ली: समलैंगिकतेला अपराध मानणाऱ्या कलम 377 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. दोन व्यक्तींनी परस्परांच्या सहमतीनं ठेवलेले समलैंगिक संबंध वैध की अवैध, यावरील निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात येईल. समलैंगिक संबंधांबद्दल सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र जगातील इतर देशांमध्ये समलैंगिकतेला कायद्याची मान्यता आहे की नाही, याबद्दल जगभरातील इतर देशांचे काय नियम आहेत, याची माहिती असणंदेखील आवश्यक आहे. काही देशांमध्ये समलैंगिकता गुन्हा समजला जातो, तर काही देशांमध्ये तर यासाठी फाशीची शिक्षा सुनावली जाते. या देशांमध्ये सुनावली जाते फाशीची शिक्षासुदान, इराण, सौदी अरेबिया, येमेन या देशांमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली जाते. सोमालिया आणि नायजेरिया या देशांमधील काही भागांमध्येही समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना फासावर चढवलं जातं. दोन पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवल्यास त्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद 13 देशांच्या कायद्यांमध्ये आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, कतार या देशांमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. इंडोनेशियात शरीरसंबंध ठेवणाऱ्या पुरुषांना चाबकानं मार दिला जातो.
या देशांमध्ये समलैंगिक संबंधांना अमान्यबेल्जियम, कॅनडा, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, स्वीडन, आईसलँड, पोर्तुगाल, अर्जेंटिना, डेन्मार्क, उरुग्वे, न्यूझीलँड, फ्रान्स, ब्राझील, इंग्लंड, स्कॉटलँड, लक्झेमबर्ग, फिनलँड, आर्यलँड, ग्रीनलँड, कोलंबिया, जर्मनी, माल्टा या देशांमध्ये समलैंगिक लग्नांना परवानगी आहे. नेदरलँडनं सर्वात आधी म्हणजेच डिसेंबर 2000 मध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मंजुरी दिली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 2015 मध्ये समलैंगिक लग्नांना मान्यता दिली. 2001 मध्ये अमेरिकेतील 57 टक्के जनतेचा समलैंगिक संबंधाना विरोध होता. मात्र 2017 मध्ये 67 टक्के लोकांनी अशा संबंधांना पाठिंबा दिला.