मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. देशातील १४ राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली आहे. तर अनेक ठिकाणी डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्यानं वाहतूकखर्च वाढला आहे. त्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत. पुढील काही दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यात एका करारावरून वाद सुरू आहे. या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या भांडणाचा फटका सोमवारी पाहायला मिळाला. सोमवारी पेट्रोलच्या दरांत ३५ पैशांनी वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलचा दर शंभराच्या जवळ पोहोचला आहे. तर डिझेल नव्वदीच्या उंबरठ्यावर आहे.
सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात एका प्रस्तावावरून वाद सुरू आहे. सध्या सुरू असलेला करार २०२२ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सौदी अरेबियानं ठेवला आहे. यूएईचा याला विरोध आहे. तेल निर्यातदार देशांचा समूह असलेला ओपेक आणि सहकारी उत्पादक देशांनी तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या जागतिक कराराचा विस्तार करण्याच्या योजनेला यूएईनं रविवारी विरोध दर्शवला. आमच्या तेल उत्पादनाच्या कोट्यात वाढ न करता कराराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव अन्यायकारक असल्याचं यूएईच्या ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.
ओपेक समूहात सौदी अरेबिया प्रमुख देश आहे. यूएई तेल उत्पादनात वाढ करून सौदी आणि इतर देशांशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे. समूहाच्या उत्पादनाला मर्यादेत ठेवण्याच्या कामात सौदीनं प्रमुख भूमिका बजावली आहे. मात्र उन्हाळाच्या दिवसात उत्पादन वाढायला हवं, बाजारासाठी उत्पादनातील वाढ गरजेची आहे, असं यूएईला वाटतं. गेल्या वर्षी जगभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू होता. त्यावेळी इंधनाची मागणी घटली. त्यामुळे तेल उत्पादक देशांनी खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्यासाठी करार केला होता.