ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - सौदी अरेबियातील एका नागरिकाने घरकाम करणा-या महिलेचा हात कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारताने या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवत त्या व्यक्तीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले आहे. कस्तुरी मणिरत्नम (५०) असे पीडित महिलेचे नाव असून ती मूळची तामिळनाडूतील आहे. तिच्यावर सध्या रियाधमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती वेल्लोरमध्ये राहणा-या तिची बहीण विजयकुमारीने दिली.
' गेल्या महिन्यात २९ सप्टेंबर रोजी हा नृशंस प्रकार घडला. आपला मालक वेळेवर पगार देत नाही, तसेच आपला छळ करतो, अशी तक्रार कस्तुरीने नोंदवली होती. त्यानंतर तिने घराच्या बाल्कनीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, आधीच भडकलेल्या तिच्या मालकाने तिचा उजवा हातच कापून टाकला. हा प्रकार पाहून तेथील शेजा-यांनी इतरांच्या मदतीने कस्तुरीला रुग्णालयात दाखल केले,' असे विजय कुमारीने सांगितले.
सौदीतील भारतीय दूतावासातील अधिका-यांनी कस्तुरीची भेट घेतल्यानंतर वेल्लोरमध्ये राहणा-या तिच्या मुलाशी संपर्क साधला. बाल्कनीतून उतरताना पडल्याने कस्तुरीला स्पायनल इंज्युरीही झाल्याचे अधिका-यांनी तिच्या मुलाला सांगितले. याप्रकरणानंतर कस्तुरीला रुग्णालयात भेटण्यास गेलेल्या एका व्यक्तीने तिचा व्हिडीओही अपलोड केला असून त्यात ती आपल्याला भारतात परत पाठवण्याची मागणी करत असल्याचे दिसत आहे.
हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून क्सतुरीला न्याया मिळावा यासाठी भारत सरकार सर्व ते प्रयत्न करत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केले. रियाधमधील आमच्या दूतावासातील अधिका-यांनी ही घटना सौदीच्या पराराष्ट्र खात्याच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली असून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असल्याचे स्वरुप म्हणाले.