अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मोठं विधान केलं आहे. "काल रात्री जे काही घडलं ते संपूर्ण देशासाठी खूप विचित्र आहे. जनतेचा प्रचंड पाठिंबा असलेले लोकप्रिय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. हे अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य आहे. केजरीवाल यांची पत्नी, मुलं आणि आई-वडील हाऊस अरेस्टमध्ये आहेत" असा दावा सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
सौरभ भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांच्या घरातून अटक केली. आता भाजपा आणि केंद्र सरकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणालाही भेटू देण्याइतकी माणुसकी किंवा नैतिकता दाखवायला तयार नाहीत.
भारद्वाज यांनी दावा केला की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाल्यापासून त्यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, 80 ते 85 वर्षांचे पालक किंवा त्यांच्या मुलांना भेटू दिलं जात नाहीत. याशिवाय दिल्ली सरकारच्या मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांना भेटू दिले जात नाही.
भाजपावर निशाणा साधत ते म्हणाले की, केंद्राने किमान माणुसकीही पाळली नाही. तपास यंत्रणेच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील नातेवाईक, पक्षाचे लोक आणि मंत्री अरविंद यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी दिली असती, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सगळे म्हणू शकले असते. केंद्राने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.