वडोदरा - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून रणकंदन पेटले. राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपा, मनसे आणि शिंदे गट रस्त्यावर उतरले होते. तर राहुल गांधींच्या विधानाचं समर्थन करत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आता सावरकरांवर गंभीर आरोप केले आहे. गांधी हत्येत सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवण्यास मदत केली होती असा दावा तुषार गांधींनी केला आहे.
तुषार गांधींनी एका वृत्त माध्यमाला मुलाखत देताना म्हटलं की, ज्या बंदुकीने महात्मा गांधी यांची हत्या झाली. ती पुरवण्यास सावरकरांनी मदत केली होती. कपूर कमिशनचा अहवाल वाचावा. ज्यात त्यांनी सर्व तपास, पुरावे याचा अभ्यास करून ते रेकॉर्डवर आणले होते. या रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. २६-२७ जानेवारी १९४८ ला सावरकर हे नथुराम गोडसे आणि नारायण आपटे भेटले होते. तोपर्यंत त्यांच्याकडे बंदूक नव्हती असं त्यांनी सांगितले.
तसेच हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली. बंदूक घेणारे आणि बंदूक चालवणारे हे दोघेही सावरकरांचे अनुयायी होते असं तुषार गांधींनी म्हटलं. त्याचसोबत माझ्या विधानावरून कुणाला कोर्टात जायचं असेल तर जरूर जावं. त्यांना कोर्टात जाण्याचा जितका अधिकार आहे तितका मला माझ्याकडे जी काही माहिती आहे ती समोर आणण्याचा अधिकार आहे असं सांगत तुषार गांधी यांनी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले सात्यकी सावरकर?तुषार गांधी जे काही बोलतायेत ते अत्यंत खोटे आहे. चुकीचा आरोप आहे. वास्तविक पाहता न्यायालय अथवा पोलीस यांना माहिती असती तर तात्यारावांवर खटल्यातच आरोप झाले असते. तात्या सावरकर हे नथुरामला मदत करणार आहेत, तर त्यांच्यावर कटात सहभागी झाले म्हणून त्यांच्यावर आरोप झाले असते. परंतु न्यायालयाने सावरकरांना निर्दोष मुक्त केले होते. तुषार गांधी जे बोलतायेत ते न्यायालयाचा अवमान आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. मी याबाबत न्यायालयात जायचा विचार करतोय. एकदा काय ते न्याय व्हायला हवा. एकाला चाप बसला की बाकीचे शांत होतील. मी न्यायालयात धाव घेणार असं सांगत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी तुषार गांधींवर पलटवार केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"