नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांबद्दल कर्नाटकमधील आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान समोर आले आहे. वीर सावरकर हे ब्राह्मण होते, परंतु गोमांस खायचे, त्यांनी कधीही गोहत्येचा विरोध केला नाही असं आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्याच्या या विधानावरून देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते.
मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, सावरकरांबद्दल लोक असेही बोलतात ते ब्राह्मण होते, मात्र उघडपणे मांस खायचे आणि त्याचा प्रचारही करत होते. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृती परंपरेवर विश्वास ठेवणारे होते, ते कट्टर शाकाहारी होते ते सर्व दृष्टीने लोकशाहीवादी व्यक्ती होते. मोहम्मद अली जिन्नाच्या तुलनेत सावरकर अधिक कट्टरतावादी होते. सावरकरांची विचारधारा वेगळी होती त्यांनी कधी गोहत्येचा विरोध केला नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच सावरकरांची विचारधारा भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळी होती. आरएसएस, हिंदू महासभा आणि अन्य कट्टरपंथी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. लोकांना हे समजून घेण्यासाठी सामाजिक आणि राजकीयदृष्टीने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. जिन्ना कट्टर मुस्लीम असूनही डुकराचे मांस खात होते. ते कट्टरपंथी नव्हते त्यांना सरकारमध्ये उच्च पद हवं होते, त्यासाठी वेगळ्या देशाची मागणी जिन्नांनी केली असंही दिनेश गुंडुराव यांनी सांगितले.
दरम्यान, गोडसेसारख्या व्यक्तीने महात्मा गांधींची हत्या केली, तो कट्टरपंथी होता कारण आपण जे करतोय ते योग्य असं त्याला वाटत होते हा कट्टरतावाद आहे. समजा, कुणी गोरक्षक जातो, कुणाला मारतो तेव्हा तो चुकतोय असं त्याला वाटत नाही. हा सावरकरांचा कट्टरतावाद धोकादायक आहे. गांधी एक धार्मिक व्यक्ती होते. सावरकरांच्या तुलनेत गांधी लोकशाहीवादी होते असंही दिनेश गुंडूराव यांनी विधान केले.
भाजपाचा पलटवार
कर्नाटकातील मंत्री दिनेश गुंडूराव यांच्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपा नेते अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस फेक नरेटिव्हची फॅक्टरी आहे. भारत वीर सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही. देशासाठी स्वत:चं जीवन समर्पित करणाऱ्या सावरकरांपासून काँग्रेसने कधी धडा घेतला नाही. देश तोडणाऱ्या काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वात तुकडे तुकडे विचारधारेला प्रोत्साहन दिले आहे. ज्यांनी परदेशात भारताची बदनामी केली असं ठाकूर यांनी म्हटलं.