भोपाळ : गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नाव घेऊन राजकारण तापल्याचे दिसतंय. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी सावकरांच्या बाजूने आणि विरोधात अशी दोन्ही प्रकारची वक्तव्यं केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे अनेक बडे नेते सावरकर यांच्या विचारांचा आदर करतात. मात्र, काँग्रेसचे जुणेजाणते नेते दिग्विजय सिंह यांनी नुकतेच सावरकर यांच्याबद्दल एक विधान केले आहे. गायीला हिंदू धर्मात मातेचा दर्जा दिला गेला आहे, पण गाय ही आपली माता असूच शकत नाही असं सावरकर म्हणायचे, असा दावा दिग्विजय सिंह यांनी भोपाळमध्ये बोलताना केला.
मध्ये प्रदेशातील भोपाळमध्ये एका कार्यक्रमात दिग्विजय सिंह उपस्थित होते. त्यावेळी व्यासपीठ भाषण करताना त्यांनी सावरकरांच्या पुस्तकाचा दाखला देत काही विधानं केली. ते म्हणाले, "देशात असेही हिंदू लोक आहेत जे स्वत: गोमांस खातात आणि विचारतात की असं कुठे लिहलं आहे की गोमांस खाऊ नये. पण बहुतांश हिंदू हे गोहत्येला विरोध करणारे आहेत. भाजपाचे लोक नेहमी सावरकर यांचा नावाने अनेक गोष्टी सांगतात. पण सावरकर यांनी स्वत:च्या एका पुस्तकात असं लिहिलं आहे की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही", असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.
"स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या पुस्तकाच स्पष्टपणे लिहिलं आहे की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी कोणताही संबंध नाही. तसेच गाय ही स्वत:च्या मर्जीने जगते. त्यामुळे गाय आपली माता असूच शकत नाही. त्यामुळे गोमांस खाण्यात काहीच चुकीचं नाही असंही सावरकर यांनी स्वत:च्या पुस्तकात लिहिलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक सावरकर यांच्या शिकवणीबद्दल इतरांना सांगत असतात. त्यांना आता या गोष्टी तुम्ही सांगाल ना?", असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.