नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक कुशल नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचे योगदान दिले. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला. दलितांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत म्हणून सावरकरांनी संघर्ष केला होता, अशी प्रशंसा काँग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी यांनी सोमवारी केली.
हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपने केल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसने सावरकरांबद्दल गौरवोद््गार काढले आहेत. अभिषेक सिंघवी यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सावरकरांच्या विचारसरणीला माझा विरोध असला तरी ते एक कुशल नेता होते, हे सत्य नाकारता येणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा अशी मागणी मोदी सरकारकडे करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश भाजपने म्हटले होते. या मागणीवर वादंग माजल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले होते की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आमचा विरोध नाही. मात्र, त्यांनी मांडलेल्या हिंदुत्ववादी विचारांशी आम्ही सहमत नाही. त्या विचारसरणीला आमचा कायमच विरोध राहील.
गांधी हत्या आणि सावरकर : सावरकरांना भारतरत्न किताबाने गौरविण्यात यावे या मागणीवर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी टीका केली होती. महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणाच्या खटल्यात स्वा. सावरकर हे एक आरोपी होते. त्यांची नंतर निर्दोष मुक्तता झाली हा भाग अलाहिदा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने याआधी व्यक्त केली होती.