काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत सावरकरांचा फोटो, भाजपचा चिमटा; काँग्रेसचे स्पष्टीकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 07:57 PM2022-09-21T19:57:33+5:302022-09-21T20:02:44+5:30
काँग्रेस आणि भाजप नेते परत एकदा वीर सावरकरांवरुन आमने सामने आले आहेत.
नवी दिल्ली: वीर सावरकर पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंमध्ये सावरकरांचा फोटो दिसल्यानंतर हे प्रकरण उफाळून आले आहे. काँग्रेसच्या दौऱ्यात वीर सावरकरांचा फोटो दाखवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने राहुल गांधींपासून ते जवाहरलाल नेहरूंपर्यंत सर्वांची खिल्ली उडवली, तर काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला. बटेश्वर प्रकरणात वीर सावरकरांची माफी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची साक्ष यासंबंधीचा वादही त्यांनी उघड केला.
छपाईदरम्यान चूक झाली
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'भारत जोडो यात्रे'च्या पोस्टरचा फोटो ट्विट केला होता. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या मधोमध वीर सावरकरांचा फोटोही आहे. यावर काँग्रेसने स्वतःचा बचाव करत याला प्रिंटिंग मिस्टेक म्हटले आहे. पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांचे चित्र हवे होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. एका बूथ स्तरावरील कार्यकर्त्याने सांगितले की, पोस्टर डिझाइन करणाऱ्या मुलाने हे फोटो ऑनलाइन शोधले होते. त्यांने नीट न तपासता ही छपाई केल्याचे काँग्रेसचे म्हणने आहे.
Veer Savarkar’s pictures adorn Congress’s Bharat Jodo Yatra in Ernakulum (near airport). Although belated, good realisation for Rahul Gandhi, whose great grandfather Nehru, signed a mercy petition, pleaded the British to allow him to flee from Punjab’s Nabha jail in just 2 weeks. pic.twitter.com/i8KxicPl1y
— Amit Malviya (@amitmalviya) September 21, 2022
अमित मालवीय यांची खोचक टीका
हे पोस्टर केरळमधील एर्नाकुलम विमानतळाजवळ लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फोटोसोबत अमित मालवीय यांनी लिहिले – 'एर्नाकुलममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचाही फोटो आहे. उशीरा का होईना, राहुल गांधींना जाणीव झाली. राहुल यांचे पणजोबा नेहरू पंजाबच्या नाभा तुरुंगात असताना इंग्रजांना विनंती करुन अवघ्या दोन आठवड्यांत बाहेर आले होते.'
जयराम यांचा भाजपवर पलटवार
अमित मालवीय यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पलटवार केला आहे. 'तुम्हाला वस्तुस्थिती माहित नाही. एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने दाखवून, तुम्ही बदनामी करता. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीची नोटीस पाठवत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षही असे प्रश्न उपस्थित करत आहे. व्हीपी सिंग सरकारच्या काळात सीपीएम आणि भाजपची युती होती, तसाच प्रकार सुरू आहे,' असं ते म्हणाले.
Typical Malaviya BS that is peddled as history. Nehru spent a total of almost ten years in jail and never ever submitted a mercy petition like Savarkar first and later Vajpayee and others. Let’s talk about the Bateshwar back stabbing…. https://t.co/2Kym4Znrwb
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) September 21, 2022
खेरांनी ‘बटेश्वर साक्षी’चा मुद्दा उपस्थित केला
काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही याबाबत भाजपला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की जवाहरलाल नेहरू यांनी सुमारे 10 वर्षे तुरुंगात घालवली आणि त्यांनी कधीही दयेचा अर्ज लिहिला नाही. प्रथम सावरकरांनी, नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि इतरांनी लिहिला. बटेश्वरच्या साक्षीचे काय?' असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला.
काय आहे 1942चे बटेश्वर प्रकरण?
बटेश्वरचे प्रकरण 1942 सालचे आहे. या वादाने अटलबिहारी वाजपेयींचा कधी पिच्छा सोडला नाही. अटलबिहारी वाजपेयी हे आग्रा जवळील बटेश्वरचे रहिवासी होते. त्यांच्यावर आरोप आहे की, 1942 मध्ये 'भारत छोडो' आंदोलन सुरू असताना त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या घटनेची इंग्रजांसमोर साक्ष दिली होती, त्यामुळे 4 स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा झाली होती. वाजपेयींनी या वादातून अनेकवेळा दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण 2004 मध्ये त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत लढवणारे राम जेठमलानी यांनी ही बाब समोर आणली होती. लीलाधर वाजपेयी यांना पुढे करून त्यांनी या वादाला खतपाणी घातले होते. बटेश्वर प्रकरणात तुरुंगात गेलेल्या लोकांपैकी लीलाधर वाजपेयी हेदेखील एक होते.