नवी दिल्ली - केंद्रातून भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. ममता यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर, गुरुवारी ममता यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशीही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचं ममता यांनी सांगितलं.
ममता 26 जुलैपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शहा आणि सोनिया गांधींपासून ते शरद पवार अशा दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या आहेत. 'मी शरद पवारांशी बोलले. ही भेट यशस्वी झाली. आम्ही राजकीय कारणांसाठी भेटलो होतो. लोकशाही प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा, अशीच आमची घोषणा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्यादेखील पाठिशी आहोत. आम्ही या ठिकाणी दर दोन महिन्यांनी येत राहू', असे ममता यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना म्हटले.
विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सुरू असलेल्या बैठका कोणत्याही नेत्याच्या घरी आयोजित करायच्या नाहीत, असे ठरविण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवावी, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांना २१ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत केले होते. त्यानुसार, सध्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकाही सुरू आहेत. या बैठकींच्या तयारीसाठीच तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर दिल्लीत तळ ठोकून आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव करून ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर आल्याने त्यांचे दिल्लीतही वजन वाढले आहे.