श्रीनगर: सुंजवां येथील भारतीय लष्कराच्या तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी सुभेदार मदन लाल चौधरी यांनी अतुलनीय शौर्य दाखवत आपल्या कुटुंबाला वाचवल्याची माहिती समोर आली आहे. सुभेदार मदन लाल चौधरी यांनी नि:शस्त्रपणे दहशतवाद्यांशी दोन हात केले. यावेळी त्यांच्या छातीत गोळी लागली पण त्यांनी शेवटपर्यंत आपल्या कुटुंबाला दहशतवाद्यांकडून जास्त नुकसान पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. यावेळी त्यांची मुलगी नेहा हिच्या पायाला गोळी लागली. मात्र, मदन लाल चौधरी यांनी प्रतिकार केला नसता तर दहशतवाद्यांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारले असते, असे त्यांचा भाऊ सुरिंदर चौधरी यांनी सांगितले. मदन लाल चौधरी यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार'!सुंजवां येथे दहशतवाद्यांसोबत शनिवारपासून सुरू असलेली चकमक सोमवारी तब्बल 40 तासांनंतर संपुष्टात आली. भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, या चकमकीत सैन्याचे 5 जवान शहीद झाले, तर एका निष्पाप नागरिकाचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अखेर संपली असून परिसरात तपास मोहीम सुरू आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. येथील सीमा सुरक्षा दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. हे दहशतवादी एका इमारतीत लपून बसले आहेत. भारतीय सैन्याने या इमारतीला घेराव घातला असून सध्या याठिकाणी चकमक सुरु आहे.