ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 25 - सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकी प्रकरणातील मुख्य आरोपी व गुजरातीमधील माजी IPS अधिकारी डी.जी वंजारा यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या बनावट चकमकींच्या आरोपांसंदर्भात एक खळबळजनक विधान केले आहे.
वंजारा यांनी सांगितले की, "कोणतीही बनावट चकमक केलेली नाही. कर्तव्य निभावताना ज्या काही चकमकी केल्या त्या सर्व कायद्याच्या चौकटीत ठेऊन करण्यात आल्या होत्या."
पुढे सोहराबुद्दीन शेख चकमकीप्रकरणी सांगताना वंजारा यांनी खळबळजनक विधान केले आहे. "जर हे एन्काउंटर केले नसते तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जिवंत नसते", असा दावा वंजारा यांनी केला आहे.
अहमदाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.
दरम्यान, वंजारा हे गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. कारण जेलमधून सुटका झाल्यानंतर ते आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक सार्वजनिक सभा आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत.
अहमदाबादमधील ऐतिहासिक टागोर हॉलमध्ये जनतेला संबोधित करताना डी.जी. वंजारा म्हणाले की, "जे एन्काउंट बनावट असल्याची बतावणी करुन माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत, जर ते एन्काउंटर केले नसते तर आज गुजरातचं काश्मीर झालं असतं.
सध्या वंजारा प्रत्येक जाहीर सभा तसंच कार्यक्रमांमध्ये स्वतःच्या कामगिरीचे समर्थन करताना दिसत आहेत, त्यानुसार लवकरच ते भाजपाच्या तिकिटावर आपली राजकीय कारर्कीदी सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भाजपा किंवा स्वतः वंजारा यांच्याकडून यावर मात्र उघडपणे कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.
(डी.जी.वंजारा)