सांगली : गणेशोत्सवात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीवेळी डॉल्बी लावणाऱ्या सात मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने, नवव्या आणि अकराव्या दिवशी सांगली शहरात डॉल्बीविरहित मिरवणूक पार पडली. त्यामुळे शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाढ झाली. शिवाय डॉल्बीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला. मिरजेत मात्र गणेश मंडळांनी पोलिसांकडे दुर्लक्ष करीत डॉल्बीवर खुर्दा उधळण्याचे धाडस केले. यंदा गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित असावी, असा निश्चय पोलीस प्रशासनाने केला होता. गणेशोत्सवापूर्वी डॉल्बीमालकांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही पाचव्या दिवशी काही गणेश मंडळांनी अपेक्षित डेसिबल क्षमतेपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी लावले होते. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मंडळांसह डॉल्बी मालकांवर कारवाई केली. परिणामी नवव्या आणि अकराव्या दिवशी मिरवणुका काढणाऱ्या गणेश मंडळांनी जाणीवपूर्वक पारंपरिक वाद्यांनाच पसंती दिली. जिल्ह्यात सुमारे ३८००, तर सांगली शहरात १२०० डॉल्बीचालक आहेत. प्रत्येक डॉल्बीचालकाची या व्यवसायात कमीत कमी दोन ते अडीच लाखांची गुंतवणूक आहे. गणेश मंडळांच्या मागणीनुसार २५ ते ७५ हजारापर्यंत भाडे आकारून डॉल्बी यंत्रणा वापरास देण्यात येते. महापालिका क्षेत्रात सहाशेहून अधिक गणेश मंडळे आहेत. बहुतांश मंडळे मिरवणुकीत डॉल्बी लावण्यास प्राधान्य देतात. त्यावर लाखोंचा खुर्दा उधळला जातो, परंतु यंदा सांगली शहरातील हा खर्च वाचला. (प्रतिनिधी)
डॉल्बी बंदीमुळे सांगलीत लाखोंचा खुर्दा वाचला
By admin | Published: September 11, 2014 10:31 PM