ऐझवाल/इम्फाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील झो जमातीच्या लोकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मिझोरममध्ये विविध ठिकाणी मंगळवारी निघालेल्या मोर्चांत हजारो लोक सहभागी झाले होते.
दरम्यान मणिपूरमध्ये ४ मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणी सातव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिझोरममधील सत्ताधारी आघाडी एनएमएफने मोर्चांना पाठिंबा देण्यासाठी आपली कार्यालये बंद ठेवली होती. या मोर्चांना काँग्रेस, झोराम पीपल्स मूव्हमेंट या विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला होता. मणिपूरमधील झो जमातीच्या लोकांवर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याचा शोध सुरू म्यानमारमध्ये एका महिलेची हत्या झाली असताना ती घटना मणिपूरमध्ये घडल्याचे सांगणारा एक बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
तो व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याच्या आयपी ॲड्रेसचा पोलिस शोध घेत आहेत. त्यावरून त्याचा माग काढून कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
म्यानमारच्या ७१८ नागरिकांचा अवैधरीत्या प्रवेश, ३०१ बालकेही
गेल्या आठवड्यात म्यानमारच्या ७१८ नागरिकांनी मणिपूरमध्ये अैवधरीत्या प्रवेश केला. त्यात ३०१ बालकांचा समावेश आहे. अवैधरीत्या मणिपूरमध्ये आलेल्या म्यानमारच्या नागरिकांची माहिती आसाम रायफल्स, इंडिया-म्यानमार गार्डिंग फोर्सने केंद्रीय गृह खाते व मणिपूर सरकारला दिली. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये म्यानमारी घुसखोरांमुळे आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे राज्य सरकारचे मत असून ते केंद्राला कळविण्यात आले आहे.
जम्मू, दिल्लीत निदर्शने
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) व जे. के. किसान तेहरिक या संघटनांनी मंगळवारी जम्मूमध्ये तर आम आदमी पक्षाने दिल्लीत निदर्शने केली.