ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - विदेश दौ-यांच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा लक्ष्य केले जाते, विरोधक त्यांच्यावर टीकाही करत असतात. मात्र जास्तीत जास्त देशांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर मोदींचा भर असून ते विरोधकांच्या टीकेकडे जास्त लक्ष देत नाहीत, ना भाष्य करतात.. मात्र असे असले तरी हेच मोदी परदेश दौ-यांदरम्यान काटेकोरपणे वेळेची बचत करण्यास प्राधान्य देतात आणि त्यासाठीच रात्री विमानप्रवास करून ते प्रवासादरम्यानच आपली झोप पूर्ण करतात.
'एअर इंडिया'च्या फ्लाईटने संपूर्ण जगभर प्रवास करणा-या पंतप्रधान मोदींच्या चेक-इन बॅग्ज सध्या विमानाच्या बाहेर येताना दिसतच नाहीत, त्याचे कारण म्हणजे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मोदी रात्री हॉटेलमध्ये आराम करण्याऐवजी त्याच वेळेत प्रवास करण्यास प्राधान्य देतात आणि विमानातच आपली झोप पूर्ण करतात.
पंतप्रधान मोदी नुकतेच, बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला, तर दिवसभरात त्यांनी या देशांना भेटी देऊन आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला. दिल्ली ते ब्रसेल्स ( बेल्जियम), ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी.सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्रीच प्रवास करण्यास प्राधान्य दिले.
एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी केवळ २ रात्री, वॉशिंग्टन व रियाध येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला. ' केवळ ९७ तासांमध्ये मोदींनी अमेरिकेसह विविध देशांचा दौरा केला. जर त्यांनी रात्री विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला नसता तर याच दौ-यासाठी आम्हाला कमीत कमी ६ दिवस तरी लागले असते' असे त्या अधिका-याने नमूद केले.
दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विदेश दौरे हे अधिक काळाचे व एका शहरापुरतेच मर्यादित असायचे, अशी माहिती एका अधिका-याने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर सांगितली. ते फार कमी वेळी रात्री प्रवास करत असत. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनांनुसार, विदेश दौरे हे थोडक्यात आटोपणारेच असतात. रात्रीच्या सुमारास जर कोणतीही महत्वपूर्ण कामे होणार नसतील, तर अशा वेळेस रात्री हॉटेलमध्ये थांबणे म्हणजे वेळेचा दुरूपयोग केल्यासारखेच आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ते रात्रीच्या वेळेस प्रवास करण्यास प्राधान्या देतात, अशी माहिती अधिका-याने दिली.
आपल्या दोन वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान मोदी ९५ दिवस विदेश दौ-यांवर होते, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग युपीए-१ व युपीए-२ च्या कार्यकाळात याच अवधीत (२ वर्ष) विदेश दौ-यानिमित्त ७२ दिवस बाहेर होते. पंतप्रधान मोदींनी २० दौ-यांमध्ये ४० देशांना भेट दिली तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी युपीए-१ च्या कार्यकाळात १५ दौ-यांमध्ये फक्त १८ देशांना तर युपीए-२ च्या कार्यकाळात दोन वर्षांमध्ये १७ दौ-यांमध्ये २४ देशांना भेट दिली.