ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 7- हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ गाय हा पवित्र प्राणीच नाही तर, तिला आईची उपमा दिली आहे. या गाईच्या गोमूत्राला पवित्र समजलं जातं. तसेच गाईचे शेणही औषधी असल्याने त्यापासून अनेक व्याधींपासून मुक्ती मिळते, असं म्हटलं जातं. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचारक मोबाईल रेडिएशनपासून बचावासाठी फोनच्या मागे चक्क शेण फासत असल्याचं समोर आलं आहे. ऐकायला थोडसं विचित्र वाटेल मात्र हे खरं आहे. संघाचे विचारक आणि अखिल भारतीय गौ सेवेचे प्रमुख शंकरलाल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केला आहे. जेव्हा शंकरलाल यांना मोबाईल फोनच्या मागे शेण का लावता यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्यांनी हे गाईचं ताजं शेण आहे. स्वतःला फोनमधून येणा-या हानिकारक रेडिएशनपासून बचावासाठी शेण लावत असल्याचा दावा केला आहे. "गाय ही आपली माता आहे. गाईचं शेण आणि गोमूत्र अमृतासारखेच आहे. या तत्त्वांमध्ये मनुष्याला सर्व व्याधींपासून मुक्ती मिळण्याची क्षमता आहे. गाईचं शेण कॅन्सरसारख्या जर्जर आजारावर उपयुक्त ठरू शकते. तर फोनच्या रेडिएशनपासून मला का नाही वाचवू शकणार", असेही ते म्हणाले आहेत.यावेळी त्यांनी गुजरातमधल्या जुनागडमध्ये गोमूत्रात मिळालेल्या सोन्याचा संदर्भ देत सर्वांनीच मोबाईल फोनला शेण लावण्याचं आवाहन केलं आहे. "मी गोमूत्र आणि शेण याचे अंश सेवन करतो. त्यामुळेच 76 वयातही माझं स्वास्थ्य चांगलं आहे. आम्ही गर्भवती महिलांनाही गोमूत्र आणि शेणाची पेस्ट करून देतो. जेणेकरून त्या सृदृदढ बाळाला जन्म देतील. मात्र ते शेण फक्त देशी गायीचंच असलं पाहिजे", असंही त्यांनी सांगितलं आहे.