नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. तसेच, जगभरातील अनेक संशोधक कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत आढळून येणाऱ्या कोरोना रुग्यांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. यातच भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोरोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचविला आहे. यासंदर्भात खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करू सांगितले आहे.
"या आपण सर्वांनी मिळून कोरोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. २५ जुलैपासून ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करावे. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा”, असे ट्विट प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.
याचबरोबर, गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही असाच उपाय सांगितला होता. भारतीय परंपरा पूर्णपणे समजून घेण्याची गरज आहे. योगामध्ये अनेक गोष्टी आहेत. जग मानसिक आणि शारीरिक आजाराविरोधात लढा देत आहे. मात्र, योगाच्या साहाय्याने आपण रक्तदाब, ह्रदयविकार, मूत्रपिंड यकृत आणि कोरोना व्हायरस सारख्या आजारांवरही उपचार केले जाऊ शकतात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज सुमारे ५० हजार कोरोनाची लागण झालेले रुग्ण समोर येत आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या देशात १३ लाख ८५ हजार ५२२ झाली आहे. मात्र, आतापर्यंत ८,८५,५७७ लोक बरे झाले आहेत. तर ४,६७,८८२ लोकांवर उपचार सुरू आहेत.
आणखी बातम्या...
या सरकारचं भवितव्य विरोधी पक्षनेत्यांवर अवलंबून नाही; उद्धव ठाकरेंनी पुन्हा सुनावलं
शरद पवार म्हणाले, 'रिमोट कंट्रोल नाही, संवाद हवा'; उद्धव ठाकरे म्हणाले...
'अनलॉक -३' मध्ये सिनेमा हॉल उघडण्याची शक्यता, माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रस्ताव