अंकोला : काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला पायबंद घातल्याने त्या पक्षाचे नेते मला शिव्याशाप देत असतात. अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना धडा शिकविण्यासाठी कर्नाटकमधील जनतेने १० मे रोजी जय बजरंगबलीचा नारा देत मतदान करावे आणि काँग्रेसला शिक्षा द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मोदी म्हणाले की, निवृत्तीकडे डोळे लावून बसलेल्या काँग्रेस नेत्यांच्या नावावर हा पक्ष कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांत लोकांकडून मते मागत आहे. निवडणूक प्रचारात काँग्रेस नेते मला शिव्याशाप देत आहेत. ही संस्कृती कर्नाटकच्या जनतेला मान्य आहे का? सामान्य माणसापासून अन्य कोणालाही शिव्याशाप देणे कदापि आवडेल का? अशा प्रवृत्तींना कोणी माफ करेल का? असे सवाल मोदी यांनी एका प्रचारसभेत विचारले.
मोदींचा शनिवारी ३६ किमीचा रोड शो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरूमध्ये येत्या शनिवारी ६ मे रोजी ३६ किमीचा रोड शो करणार आहेत. त्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत १०.१ किमी व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत २६.५ किमी असे अंतर या रोडशोमध्ये कापले जाणार आहे.
मोदींबद्दल अपशब्द वापरल्याने नोटीसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप असलेले काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. आयोगाने म्हटले आहे की, प्रियांक खरगे यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. या नोटिसीला प्रियांक यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत उत्तर द्यायचे आहे.