देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. जय श्रीराम... एकच नारा.. एकच राम... या जयघोषणा अयोध्या नगरीत दुमदुमल्याचा दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती अयोध्या नगरीत दाखल झाले आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही सुरुवात झाली असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. गावोगावी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राम मंदिर सोहळ्यात स्थानिकांचा सहभाग दिसून येत आहे. संत, महात्मे, स्वामी आणि हिंदू धर्माच्या मठाधिपतींनीही या सोहळ्याचा आनंद व्यक्त केला आहे. बाबा रामदेव यांनीही या सोहळ्याचा आनंद व्यक्त केला, मात्र वादग्रस्त विधान केलं आहे.
अयोध्येतील सोहळ्यात देशभरातील रामभक्त सहभागी झाले आहेत. रामभक्तांचा पूर अयोध्येच्या शरयूतीरावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे, सर्वच आनंद आणि उत्साह आहे. देशातील दिग्गजांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते, ते बहुतांश जण सोहळ्याला उपस्थित राहिल्याचं दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसने यापूर्वीच अयोध्येतील सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं होतं. बाबा रामदेव यांनी राम मंदिर सोहळ्याचा उत्साह आणि आनंद व्यक्त करताना अप्रत्यक्षपणे राम मंदिर सोहळ्यात सहभागी न होणाऱ्यांना टोला लगावला आहे.
रामदेव बाबांनी एका वृत्तवाहिनीवर राम मंदिर सोहळ्याचा आनंद व्यक्त करताना टीकाकारांना टोला लगावला. तामिळनाडू सरकारकडून रामलला प्रसारण रोखण्यात येणार आहे, असा प्रश्न बाबा रामदेव यांना विचारण्यात आला होता. त्यावर, सर्वत्र रामराज्याचा जयघोष होत आहे. पण, जे रामपासून दूर जात आहेत, ते सत्तेपासून कायमचे दूर होतील. एकतर रामराम म्हणा.. जय सियाराम म्हणा.. आणि जे रामनाम घेणार नाहीत, त्यांचा रामनाम सत्य होईल, असे विधान बाबा रामदेव यांनी केले. तसेच, प्रत्येकाला रामनामाच्या शरणमध्ये यावेच लागेल, आणि प्रभू श्रीराम यांची महिमा गावीच लागेल, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी यापूर्वीच अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित नाहीत. तर, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे हेही अयोध्येत आजच्या सोहळ्याला उपस्थित नाहीत. मात्र, सर्वांनीच २२ जानेवारीनंतर अयोध्येत दर्शनाला जाण्याचा मानस बोलावून दाखवला आहे.