नवी दिल्ली : चीनचे नाव घेऊन सांगतो, आम्ही घाबरत नाही. जर घाबरत असतो तर सीमेवर सैन्य तैनात केले नसते. हे सैन्य राहुल गांधींनी नव्हे तर नरेंद्र मोदींनी तैनात केले आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पाहावे की १९६२ मध्ये काय झाले होते. लडाखमधील पँगाँगजवळील परिसर १९६२ पासून चीनने जबरदस्तीने बळकावला असल्याचेही त्यांनी म्हटले.
एका मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, तुम्ही विचार करा. अचानक इतके अहवाल का येत आहेत, हे सर्व आधी का होत नव्हते. जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते. त्या घटनेवरचा माहितीपट का बघायला मिळाला नाही. सर्व काही षडयंत्र रचू्न केले जात आहे. बीबीसी डॉक्युमेंटरी आणि जॉर्ज सोरोस यांच्या विधानाची वेळ योगायोग नाही. याचा सरळ अर्थ असा की, भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला नसला तरीही लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये निवडणूक हंगाम आला आहे.
‘पाकिस्तानात जे काही चाललेय, त्याला भारत जबाबदार नाही’पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली आहे, त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, पाकिस्तानचे भवितव्य त्यांच्या स्वतःच्या कृती आणि निवडीनुसार ठरवले जाईल. अशा परिस्थितीत कोणीही अपघाताने पोहोचत नाही. त्यांच्यावर अशी वेळ का आली हे समजून घेणे त्यांचे काम आहे. सध्या पाकिस्तानमध्ये काय चालले आहे, त्याचा भारताशी काहीही संबंध नाही.