स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला 67 वर्षे झाली आहेत. याच निमित्ताने एसबीआय आपल्या ग्राहकांना सहा हजार रुपये जिंकण्याची संधी देतेय असा मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पण तुम्हालाही बँकेच्या नावाने असा हा मेसेज आला असेल तर सावध व्हा. हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं आता समोर आलं आहे. स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या ऑफर आणत असते. परंतु एसबीआयने आपल्या ग्राहकांना 6,000 रुपये देण्याची कोणतीही योजना सुरू केलेली नाही.
स्टेट बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे की, अनेक सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली आहे. सबसिडी, फ्री ऑफर, फ्री गिफ्ट्स इत्यादी मार्गाने ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. ऑफरचा फायदा घेण्यासाठी अनेक वेळा लोक त्यांचे बँक तपशील, वैयक्तिक माहिती शेअर करून जाळ्यात अडकतात.
एसबीआयच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त बँक लोकांच्या खात्यात 6000 रुपये ट्रान्सफर करणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 4 प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर पैसे पाठवले जातील असं सांगितलं जातं. यानंतर त्यांच्या खात्यातून त्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीसारखे बँकिंग तपशील विचारून सर्व पैसे काढून घेतले जातात.
SBI ने देखील आपल्या ग्राहकांना पॅन कार्डच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीबद्दल इशारा दिला आहे. यासोबतच, बँक कोणत्याही प्रकारची लिंक पाठवून त्यावर पॅन तपशील अपडेट करण्यास सांगत नाही, असे सांगण्यात आले. यासोबतच, बँकेने असेही सांगितले आहे की, जर असा काही मेसेज आला तर report.phishing@sbi.co वर तक्रार करता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.