आलमपूर : मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या आलमपूर शाखेने एक मोठी चूक केली आहे. एकच बँक खाते दोन व्यक्तींना देण्याचा प्रताप या बँकेने केला आहे. यामुळे उडालेला गोंधळ चर्चेचा विषय बनला आहे.
आलमपूर शाखेने य़ा दोघांना एकच खाते क्रमांक दिला आहे. तसेच त्यांचा ग्राहक क्रमांकही एकच आहे. यामुळे एक खात्यामध्ये पैसे जमा करत होता तर दुसरा ते पैसे काढत होता. हा हास्यास्पद प्रकार एक दोनदाच झालेला नाही तर पूर्ण सहा महिने हा प्रकार चालू होता. यामुळे पहिल्या खातेधारकाने जमा केलेल्यांपैकी 89 हजार रुपये दुसऱ्या खातेदाराने या काळात काढले. जेव्हा पहिल्या खातेधारकाने याची तक्रार केली तेव्हा बँकेचे प्रशासन अवाक् झाले.
आलमपूरच्या रुरई गावात राहणाऱ्या हरविलास हुकुम कुशवाह हे हरियाणामध्ये काम करतात. त्यांच्या वडीलांचे खाते आलमपूरच्या एसबीआयमध्ये आहे. बँकेने त्यांना 12 नोव्हेंबर 2018 ला पासबूक दिले होते. त्यांचा ग्राहक क्रमांक 88613177424 आणि बचत खाते क्रमांक 20313782314 असा होता.
खाते उघडल्यानंतर हुकुम हरियाणाला गेले. तेथून ते पैसे जमा करत राहिले. जेव्हा हरियाणातून परत आले तेव्हा त्यांनी 16 ऑक्टोबरला पैसे काढण्यासाठी बँक गाठली. तेथे गेल्यावर त्यांना खात्यामध्ये केवळ 35 हजार रुपये असल्याचे समजले. तेव्हा बँकेने त्यांना 7 डिसेंबर 2018 ते 7 मे 2019 या काळात 89 हजार रुपये काढण्यात आल्याचे सांगितले. यानंतर हुकुम यांनी बँकेचे मॅनेजर राजेश सोनकर यांच्याकडे तक्रार केली.
चौकशी केली असता हुकुम सिंह आणि रोनी गावाचा रामदयाल बघेल यांचा खाते क्रमांक एकच होता. बघेल यांना बँकेने 23 मे 2016 ला पासबूक दिले होते. हा प्रकार पाहून बँकेच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी बघेलला बोलावून घेतले आणि घडलेला प्रकार सांगितला. यावेळी बघेलने त्यांना 3 टप्प्यांमध्ये पैसे देण्याचे कबूल केले. खरा किस्सा तर पुढे घडला जेव्हा त्याने कारण सांगितले.
बघेल याने सांगितले की, माझे खाते होते. त्यामध्ये पैसे येत होते. मला वाटले पंतप्रधान नरेंद्र मोदी पैसे पाठवत आहेत. यामुळे मी गरज पडेल तसे पैसे काढत होतो. घराच्या कामासाठी पैसे काढले. या साऱ्या प्रकरणामागे बँकेचा दोष आहे.
महत्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी काळ्या पैशांविरोधात मोहिम उघडताना प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असल्याचे आश्वासन दिले होते. यामुळे बघेलला तेच पैसे मोदी पाठवत असल्याचे वाटले.