नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) पुन्हा एकदा आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सावध केलं आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून य़ाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लोकांना फेक मोबाईल अॅप्स डाऊनलोड करणं टाळण्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच बँकेने काही सेफ्टी टिप्स पाळण्यास सांगितलं आहे.
एसबीआयने (SBI) ट्विट केलं आहे. यामध्ये अशा ठिकाणांहून अॅप डाऊनलोड करू नका जे पूर्णत: व्हेरिफाय केलेले नाहीत असं म्हटलं आहे. "आपली सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. येथे काही सेफ्टी टिप्स (safety tips) आहेत, ज्या आपल्याला वैयक्तिक आणि आर्थिक डेटा (personal/financial data) चोरीपासून वाचवू शकतात. आजकाल वाढत्या फसवणुकीचा विचार करता बँकेने आपल्या ग्राहकांना अधिक सावधगिरीचा सल्ला दिला आहे" असं स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटलं आहे.
कोरोनाच्या संकटात फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत फेक अॅप्सच्या माध्यमातून लोकांना सहज जाळ्यात ओढण्यात येत आहे. यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एसबीआय वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट नोटीफिकेशन जारी करत असते. बनावट अॅप्स व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या ईमेल, एसएमएस, कॉल किंवा एम्बेड केलेल्या लिंकपासून लोकांनी स्वत: ला दूर ठेवावे, असा सल्ला बँकेने दिला आहे.
गेल्या आठवड्यात एका सायबर सुरक्षा संशोधकाने असा इशारा दिला होता की, फिशिंग घोटाळ्यांतर्गत चीनी मूळचे हॅकर्स एसबीआय वापरकर्त्यांना लक्ष्य करीत आहेत. ते वेबसाईटची लिंक वापरून ग्राहकांना त्यांचे केवायसी अद्ययावत करण्यास सांगत आहेत. यानंतर व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून ते 50 लाखांचे बक्षिसे जिंकण्याचे आमिष देत आहेत. आयएएनएसच्या अहवालानुसार, अशी दोन प्रकरणे समोर आली आहेत. या फसवणुकीशी संबंधित सर्व डोमेन चीनमधील नोंदी दाखवत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.