बंगळुरू - अनेकदा लोक आपलं एटीएम कार्ड आणि त्याचं पिन नंबर दुसऱ्याला देऊन पैसे काढण्यासाठी सांगतात. स्वतःचं डेबिट कार्ड पती-पत्नी, मित्र किंवा नातेवाईकांना पैसे काढण्यासाठी देणाऱ्यांना बंगळुरू कोर्टाने दणका दिला आहे. बँकेच्या नियमांनुसार एटीएम कार्डचं हस्तांतरण करता येत नाही. त्यामुळे एटीएम कार्डचा वापर संबंधित खातेधारकांशिवाय इतर कुणीही करणं अयोग्य असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. बँकेचा हे म्हणणं योग्य मानत कोर्टाने एका प्रसूती रजेवर असलेल्या महिलेची याचिका फेटाळली आहे.
नोव्हेंबर 2013 साली बंगळुरूमध्ये राहणाऱ्या वंदना या प्रसूती रजेवर होत्या. नुकतंच बाळंतपण झालं असल्याने वंदना यांनी त्यांचं एटीएम त्यांचा पती राजेश कुमार यांना देऊन पैसे काढायला सांगितले होते. राजेश यांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून 25 हजार रुपये काढले. त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. पण प्रत्यक्षात मशिनमधून पैसे बाहेर आलेच नाही. यानंतर संपूर्ण प्रकरणाला सुरूवात झाली.
एटीएममधून 25 हजार रूपये काढल्याचा मेसेज येऊनही पैसे न मिळाल्याने सुरूवातीला त्या दाम्पत्याने कस्टमर केअरला फोन करून तक्रार केली. पैसे जर मशिनमधून मिळाले नसतील तर 24 तासात पैसे अकाऊंटला येतील, असं त्याना कस्टमर केअरकडून सांगण्यात आलं. पण पैसे मिळत नसल्याने त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ‘कार्डाचे हस्तांतरण करता येत नाही. ते कार्ड एटीएम केंद्रात गेलेल्या व्यक्तीचं नव्हतं. त्यामुळे पैसे परत मिळणार नाही’ असं बँकेने सांगितलं. बँकेने दाम्पत्याला तसे नियमही दाखविले. गर्भवती असल्याने मला एटीएम केंद्रात जाणं शक्य नव्हतं म्हणून पतीकडे एटीएम दिल्याचं वंदना यांनी बँकेला सांगितलं. पण बँकेतील अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. शेवटी हे प्रकरण ऑक्टोबर २०१४ मध्ये ग्राहक कोर्टात पोहोचलं. बँकेने २५ हजार रुपये परत करावे. मी गर्भवती असल्याने बँक किंवा एटीएम केंद्रात जाऊ शकत नव्हतं. म्हणूनच पतीला डेबिट कार्ड दिले, असं वंदना यांनी सांगितलं.
कोर्टात प्रकरण गेल्यावर या दाम्पत्याने एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवलं. तसंच माहिती अधिकारांतर्गत एटीएम मशिनमधील पैशांची माहिती मिळवली. एटीएम मशिनमध्ये २५ हजार रुपये जास्त असल्याची माहिती समोर आली. सर्व पुरावे कोर्टात सादर करण्यात आले.
कोर्टामध्ये बँकेने डेबिट कार्ड संदर्भात असलेले नियम सांगितले. एटीएम कार्डाचं हस्तांतरण होत नाही, कार्ड आणि पिन दुसऱ्याला देणं नियमात बसत नाही आणि त्यामुळे या याचिकेला अर्थच नाही, असं बँकेने कोर्टात सांगितलं. कोर्टानेही हा युक्तिवाद योग्य धरला. महिलेने तिच्या पतीला डेबिट कार्डऐवजी सेल्फ चेक द्यायला हवा होता, असं कोर्टाने म्हणत महिलेची याचिका फेटाळली.