कर्नाटकातील राजकारणात खाणसम्राट जी. जनार्दन रेड्डी यांच्या नावाचा वेगळा दबदबा आहे, एकीकडे न्यायालयीन निर्बंधांमुळे आपल्या बेल्लारी साम्राज्याबाहेर राहणाऱ्या रेड्डींनी भाजपाच्यामागे संपूर्ण बळ उभे केले आहे. सध्या बेल्लारीच्या सीमेबाहेरील एका भाड्याच्या फॉर्महाऊसमधून आपली वॉररुम चालवत असलेल्या रेड्डींचा बेल्लारीत थेट प्रचार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी ठरला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
बेल्लारी परिसरात रेड्डी बोलतील तसे होते असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांसाठी निवडून येण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे त्यांचा पाठिंबा यापरिसरात महत्वाचा ठरतो. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गली जनार्दन रेड्डी यांनी भाजपासाठी आपले बळ वापरण्यास सुरुवात केली आहे. बेल्लारीतील भाजपा उमेदवार असलेल्या आपल्या भावाच्या तसेच अन्य भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी एका फॉर्महाऊसमध्ये वॉररुम तयार केली आहे. बेल्लारीत प्रवेश करण्यावर न्यायालयीन निर्बंध असल्याने त्यांनी बेल्लारीच्या सीमेबाहेरील एक फॉर्महाऊस भाड्याने घेतले आहे. एका धान्य व्यापाऱ्याच्या मालकीचे हे फॉर्महाऊस विकत घेण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. मात्र मालकाने नकार देऊन अवघ्या १०१ रुपये भाड्याने फॉर्महाऊस रेड्डींना दिले. ते भाडेही निकालानंतर देण्यास त्यांनी सांगितले आहे.
या फॉर्महाऊसमध्ये दररोज सकाळपासूनच परिसरातील नेते, कार्यकर्ते यांचे येणे-जाणे सुरु असते. तसेच त्यांच्या बैठकाही होत असतात. या सर्वांसाठी फॉर्महाऊसच्या किचनमध्ये भात, रसम, तसेच तांदळापासून तयार केलेल्या स्थानिक नाष्टा नेहमीच तयार केला जात असतो. या वॉररुममधून जनार्दन रेड्डी प्रचाराची सुत्रे जोरदाररीत्या हलवत आहेत. परंतु तरीही यावेळी अटीतटीची लढत होणार असल्याने त्यांनी कसलीही कसर राहू नये यासाठी थेट बेल्लारीत जाऊन प्रचार करण्याचे ठरवले. त्यासाठी न्यायालयाने जारी केलेले प्रवेश बंदीचे निर्बंध हटवण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने आज त्यांची याचिका फेटाळून लावली. तेथे थेट प्रचार करण्यासाठी जाणे आता जी. जनार्दन रेड्डी यांना शक्य होणार नाही.