नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने पावले उचली आहेत, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कौतुक केले आहे. सरकार आवश्यक ती सर्वप्राकारची पावले उचलत आहे आणि विरोधकही सरकारच्या कामाची प्रशंसा करत आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व प्रकारची पावले उचलत असल्याचे संपूर्ण देशाने मान्य केले आहे. सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहे.
सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत मांडले आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारला आणखीही काही आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेत 'कोविड 19'च्या टेस्ट करणाऱ्या लॅबची संख्याही वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. सुनवणीनंतर न्यायालयाने लॅब टेस्टिंग सेंटरची संख्या वाढविण्यासंदर्भातील याचिका सरकारकडे रेफर केली आहे.
आम्ही संतुष्ट सर्वोच्च न्यायालय -
सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील या पीठाने म्हटले आहे, की 'कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली आहेत त्यावर आम्ही संतुष्ट आहोत. उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत वेगाने पावले उचलली गेली. सरकारने योग्य प्रकारे काम केले, हे विरोधकांनीही मान्य केले आहे. हे राजकारण नव्हे तथ्य आहे.' न्यायमूर्ती एल. एन राव आणि सूर्यकांत देखील या पीठाचे सदस्य होते.
यावेळी, आवश्यक सुनावणीसाठी कोणते वकील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात जातील, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांवर असेल.
देशातील कोरोना बाधितांची संख्या 415 वर -
देशात आतापर्यंत जवळपास 415 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 8 जणांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा आता 3 लाख 45 हजारांवर पोहोचला आहे. तर 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.