नवी दिल्ली : मानहानीच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तक्रारदाराची माफी मागायला सांगितली आहे. अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी मान्य केले होते की, यूट्यूबर ध्रुव राठीचा व्हिडिओ रिट्विट करणे ही आपली चूक होती. दरम्यान, तक्रारदाराने ही माफी स्वीकारली की नाही, याचा विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील १३ मे रोजी होणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर यूट्यूबर ध्रुव राठीचा एक व्हिडिओ असलेले ट्विट हे रिट्विट केल्याप्रकरणी 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये विकास सांकृत्यायन नावाच्या व्यक्तीबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. अरविंद केजरीवाल यांना ट्विटरवर मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द करण्यास नकार दिला होता.
तक्रारदाराच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची पडताळणी न करता, त्यांनी ते रिट्विट केले आणि करोडो लोकांपर्यंत पोहोचवले. सध्या कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणीपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे.