ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - लष्करामध्ये पुन्हा एकदा एक घोटाळा समोर आला आहे. पाकिस्तानच्या तब्यात असलेल्या जमिनीसाठी लष्कराकडून गेल्या 16 वर्षांपासून भाडे देण्यात येत असून, या गैरव्यवहारात स्थानिक अधिकारी, लष्करी अधिकारी आणि काही खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून पैसे हडप करण्यात येत होते. या प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीआयने हा घोटाळा उघडकीस आणला. 2000 साली जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा येथील उविभागीय संरक्षण मालमत्ता अधिकारी आरएस चंद्रवंशी आणि पटवारी दर्शन कुमार यांनी अन्य व्यक्तींना हाताशी धरून तसेच खोटी कागदपत्रे सादर करून हा घोटाळा केला. खाजगी व्यक्तीला लष्कराकडून एका जमिनीचे भाडे दिले जात होते. वास्तवात मात्र ही जमीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये होती.
1969-70 च्या कागदपत्रांनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या या जमिनीसाठी संरक्षण विभागाच्या मालमत्ता खात्याकडून भाडे जमा करण्यात येत होते. तसेच आत्तापर्यंत या जमिनीच्या भाड्यापोटी राजेश कुमार नामक व्यक्तीला 4.99 लाख जारी करण्याता आल्याचे उघड झाले आहे. तसेच आतापर्यंत जा जमिनीच्या भाड्यापोटी लष्कराकडून 6 लाख रुपये देण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.