नवी दिल्ली : सरकारी बँकांनी घोटाळ्यांना बऱ्याच प्रमाणात लगाम लावण्यात यश मिळविले असताना, आता खासगी बँकातील घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये खासगी बँकातील घोटाळ्यात तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, खासगी बँकातील घोटाळ्यांची संख्या ३,०६५ वरून वाढून ३,७१० झाली आहे. या घोटाळ्यातील रकमेत तब्बल ३५.४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२० अखेरीस ही रक्कम ३४,२११ कोटी होती. मार्च २०२१ रोजी ती वाढून ४६,३३५ कोटी झाली. विदेशी बँकातील घोटाळ्यातील रक्कमही ९७२ कोटी रुपयांवरून ३,३१५ कोटी रुपयांवर गेली आहे.सरकारी मालकीच्या बँकातील घोटाळ्यांची रक्कम मात्र १,४८,२२४ कोटी रुपयांवरून घसरून ८१,९०१ कोटी रुपयांवर आली आहे. सरकारी बँकातील घोटाळ्यांची संख्याही ४,४१० वरून घसरून २,९०३ वर आली आहे. सरकारी बँकातील घोटाळ्यांचे प्रमाण घटल्यामुळे एकूण बँक घोटाळ्यातील रक्कम १,८५,४६८ कोटी रुपयांवरून घसरून १,३८,४२२ कोटी रुपयांवर आली आहे. मार्च २०२० रोजी ८,७०३ असलेली एकूण घोटाळ्यांची संख्याही मार्च २०२१ मध्ये घटून ७,४६३ झाली आहे. वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण बँक घोटाळ्यातील संख्या १५ टक्क्यांनी, तर घोटाळ्यात अडकलेली रक्कम २५ टक्क्यांनी घसरली आहे.कर्ज खात्यांमध्येच सर्वाधिक घोटाळे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकातील बहुतांश घोटाळे कर्ज खात्यात होताना दिसून येत आहे. कर्ज खात्यातील घोटाळ्यांचे प्रमाण ९९ टक्के असून, त्यात १,३७,०२३ कोटी रुपये अडकले आहेत. कार्ड आणि इंटरनेट घोटाळे १२९ कोटी रुपयांवरून घसरून ११९ कोटी रुपयांवर आले आहेत.