ऑनलाइन लोकमत
म्हैसूर, दि. २३ - अपघात किंवा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्या घटनेचे कॅमे-यात लाईव्ह चित्रीकरण करण्याची वाईट प्रवृत्ती दिवसेंदिवस समाजामध्ये वाढत चालली आहे. कर्नाटकातील हसन शहरात एका युवकावर वार होत असताना त्याची सुटका करण्याऐवजी प्रत्यशदर्शीं या घटनेचे कॅमे-यात चित्रीकरण करण्यात मग्न होते.
हसन शहरातील बस स्टँण्डवर युवकांच्या दोन गटांमध्ये मंगळवारी हाणामारी झाली. यावेळी धारदार शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. ही घटना घडली त्यावेळी शेकडो लोक बसस्थानकावर होते. पण कोणीही या युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट एकाने या हल्ल्याचे कॅमे-यात लाईव्ह चित्रीकरण केले.
हसन पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. जनतेच्या या प्रतिक्रियेने पोलिसांना धक्का बसला आहे. कारण वाद सोडवणे तर दूर पण कोणी साधा पोलिसांना फोनही केला नाही. मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हसन येथील परिवहन सेवेच्या बसस्टँण्डवर सुनील आणि धनुष या दोन तरुणांमध्ये एका मुलीवरुन वाद झाला.
या वादापूर्वी दोघेही परस्परांना ओळखत नव्हते. संतापलेल्या धनुषने आपल्या भावाला सुदीपला बस स्थानकावर बोलवून घेतले. सुदीप आपल्या तीन मित्रांसह तिथे आले. त्यांची सुनीलबरोबर वादावादी झाली. या दरम्यान सुनीलने आपल्या जवळच्या धारदार हत्याराने सुदीपला पोटात भोसकले व तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी सुदीपच्या मित्रांनी सुनीलला पकडले व सर्वांसमोर बेदम मारहाण केली. स्टँण्डवरील एकाने या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले. पोलिस तिथे दाखल झाल्यानंतर त्यांनी सुनिल आणि सुदीप दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. हे सर्व युवक २५ वर्ष वयोगटातील आहेत.