अहमदनगर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्हा टंचाईमुक्त झाला आहे़ जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुदतवाढी अभावी टँकरलाही बे्रक लागला आहे़ त्यामुळे वाड्या-वस्त्यांना टँकरने होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़नगर शहरासह जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली होती़ जिल्ह्यात साधारणपणे जिल्ह्यात सात जूनला पाऊस येतो़ परंतु जून महिन्यात पाऊस झाला नाही़ त्यामुळे राज्य शासनाने उन्हाळ्यातील टंचाईबाबतच्या सर्व उपाययोजनांना जूनपर्यंत मुदतवाढ दिली़ टँकरही सुरू करण्यात आले़ जून कोरडा गेला़ त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली़ दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाल्याने टँकरमध्ये वाढ करण्यात आली़ खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी पाणी कपात करण्यात आली़ जून महिन्यात पाऊस न झाल्याने जुलैमध्ये टँकरचा आकडा ३६९ वर पोहोचला़ जुलेही कोरडाच गेला़ त्यामुळे टंचाई उपाययोजनांना पुन्हा ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला़ आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले़ जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़ आठवडाभर जोरदार पाऊस झाला़ जिल्ह्यात अत्तापर्यंत ६५ टक्के पाऊस झाला आहे़ सर्वदूर पाऊस झाल्याने टँकरची मागणी कमी झाली असून, आॅगस्टअखेरीस १४९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता़ टँकरच्या संख्येत कमालीची घट झाली़ जिल्हा प्रशासनाने १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद केले असून, जिल्हा भरातून अहवाल येणेही बंद झाले आहे़ तसेच इतर उपाययोजनाही बंद करण्यात आल्या आहेत़जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते़ ते नुकत्याच झालेल्या पावसामुळे दूर झाले़ यापूर्वी टंचाई उपाययोजनांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली़ उपाययोजनांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली़ आॅगस्ट महिना संपूनही जिल्हा प्रशासनास मुदतवाढीबाबत सूचना प्राप्त झाल्या नाहीत़ परिणामी टंचाई उपाययोजना आपोआप बंद झाल्या आहेत़ त्यामुळे वाड्या -वस्त्यांना टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे़ मुदतवाढी अभावी टंचाईबाबतच्या उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत़ टंचाईबाबतच्या उपाययोजनांच्या मुदतवाढीस परवानगी मिळाल्यास त्या सुरू ठेवण्यात येतील़ परंतु पाऊस झाल्याने टँकरची मागणी होणार नाही आणि टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही,असे चित्र सध्या तरी आहे़ (प्रतिनिधी)
टंचाई उपाययोजनांना बे्रक
By admin | Published: September 03, 2014 11:29 PM