अलाहाबाद : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत म्हणण्यास शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना मनाई केल्याच्या निषेधार्थ मुख्याध्यापकासह २० शिक्षकांनी राजीनामे दिले. सईदाबाद बघारा येथील ए. एम. कॉन्व्हेंट या शाळेतील व्यवस्थापकाने याआधीच शाळेत ‘वंदे मातरम’ व ‘सरस्वती वंदना’ म्हणण्यास बंदी घातलेली आहे. या शाळेच्या व्यवस्थापकाचे म्हणणे असे आहे की, राष्ट्रगीत हे समाजाच्या विरोधातील असून शाळेत ते म्हणण्यास परवानगी दिली जायला नको. हा व्यवस्थापक दोन शाळा चालवितो व त्या दोन्हीही मान्यताप्राप्त नाहीत. सईदाबादेतील या शाळेत ३३० विद्यार्थी व २० शिक्षक आहेत.
मुख्याध्यापिका रितू शुक्ला म्हणाल्या की,‘‘स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाची तयारी मी करीत होते. राष्ट्रध्वज फडकल्यानंतर राष्ट्रगीत म्हटले जाते. ’’ शुक्ला म्हणाल्या की,‘‘गुरुवारी हा गीतांचा कार्यक्रम आम्ही शाळेचे व्यवस्थापक आणि मालक झिया ऊल हक यांच्यासमोर सादर केला. ते म्हणाले, ‘‘सरस्वती वंदना आणि वंदे मातरम’मुळे समाजाच्या भावना दुखावतात. नंतर त्यांनी राष्ट्रगीताला आक्षेप घेऊन हेदेखील म्हटले जाणार नाही, असे सांगितले.’’ मुख्याध्यापकांनी या बंदीचा निषेध केला तेव्हा जिया ऊल हक म्हणाले की राष्ट्रगीताच्या निर्णयाबद्दल आक्षेप आहे ज्यांनी शाळा सोडून जावे. कोणत्याही शाळेचा व्यवस्थापक राष्ट्रगीत म्हणण्यास रोखू शकत नाही. चौकशी करून कारवाई केली जाईल, असे येथी शिक्षण अधिकारी जयकरण यादव म्हणाले. राष्ट्रगीतातील ‘भारत भाग्य विधाता...’या ओळीचा चुकीचा अर्थ लावला जातो. भारत आमचा सर्वशक्तिमान किंवा प्राक्तन असू शकत नाही तर आमचे भवितव्य घडविण्याची शक्ती फक्त ‘अल्लाह’कडे असून अन्य कोणाकडेही नाही.- झिया उल हक, मालक व व्यवस्थापक, ए. एम. कॉन्व्हेंट