नवी दिल्ली - राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने निर्णय जाहीर केले आहेत. राज्यात हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही. आता, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यासाठी अद्याप वेट अँड वॉच अशीच भूमिका असल्याचं म्हटलं आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी आरोग्याचे नियम पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत मास्क वापरत राहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकारने २३ जिल्ह्यांत निर्बंध शिथील केल्यानंतरही चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात कोणतीही सूट देण्यात आली नाही. तसेच, राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळेही बंदच राहणार आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालयांबाबत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मात्र, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून काही दिवस थांबावे लागेल असे म्हटले आहे.
राज्यात शाळा सुरू करण्याची घाई नको, त्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल, असे आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. परदेशात आणखी नवीन स्ट्रेन सापडले आहेत, त्यातच महाराष्ट्रात कोविडच्या केसेस अधिक आहेत. दुसरीकडे लहान मुलांवर लसीकरण ट्रायल सुरू आहे. त्यामुळे, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे, शाळेची घंटा वाजायला आणखी अवधी असणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.
कॉलेज कधी सुरू होणार
'नुकतेच कुलगुरूंची बैठक पार पडली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. प्रत्येक विभागात कुलगुरुंना जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे. संपूर्ण स्थितीचा आढावा 15 दिवसात प्राप्त होईल. येत्या 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल,' अशी माहिती तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.