नवी दिल्ली - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. गुरुवारी हा अपघात झाला असून शाळेची बस मुलांनी भरलेली होती अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. भरधाव वेगात असल्याने शाळेची बस पलटली आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने फलसुंड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
फलसुंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेओ रोडवर बस शाळेकडे जात असताना हा अपघात झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी वेगाने बचाव कार्य सुरू केलं. पोलिसांनी याप्रकरणी सुभान खान या बस चालकाला अटक केली आहे. पोलिसांनीही या अपघाताची माहिती दिली आहे. अपघातात बसमधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. हसम खान आणि कासम खान अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
काही विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सुमारे 20 जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. बस अपघाताबाबत कोणतीही अधिक माहिती मिळाली नाही. पण अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कजोई गावजवळील एपीजे अब्दुल कलाम पब्लिक स्कूलची मिनी बस फलसुंड येथून लहान मुलांना घेऊन शाळेच्या दिशेने जात होती. याच वेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती पलटी झाली.
विद्यार्थ्यांच्या किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक बाहेर आले. बसचा वेग खूप जास्त असल्यानेच हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अब्दुल (8), सिकंदर (8), यासिन (12), हुसैन (13), आमिल (5), असलम (10), बरकत (10), अमीर (10), असरफ (12), सतार (15), दिलबर (12), हुसैन (13), नासर (7), आवेश (6), महबूब (8), बाबू (9), अश्कर (10), रिजवान (11), मनार (10), नवाब खां (9) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.