सायलेंट अटॅकमुळे मृत्यूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. एका स्कूल बस चालकाची रस्त्यातच तब्येत अचानक बिघडली. वेदना वाढत गेल्याने त्याने रस्त्याच्या कडेला बस थांबवली. बसमध्ये यावेळी विद्यार्थी देखील होते. यानंतर काही क्षणातच बस चालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
स्कूल बस चालक द्वारिका प्रसाद बाजपेयी हे बस चालवत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. मात्र त्यांनी प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारिका हे एका खासगी शाळेच्या बसचे चालक असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
बसमध्ये होती 17 मुलं
विद्यार्थी असलेली बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. हा प्रकार पाहून रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी चालकाला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दुपारी शाळा संपल्यानंतर मुलं बसने निघाले होते. बसमध्ये सुमारे 17 मुलं होती. छातीत दुखू लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली, ते पाणी प्यायले आणि मग तिथेच कोसळले.
द्वारिका यांच्या कुटुंबात कोणी नाही. ते आपल्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहत होते. एक-दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी स्कूल बस चालवण्यास सुरुवात केली. यापूर्वीही त्यांनी छातीत दुखण्याबाबत अनेकदा सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला नसल्याचं द्वारिका यांना ओळखणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं आहे.