शाळेनं फीचा तगादा लावला, 10 वीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:16 PM2020-09-01T14:16:37+5:302020-09-01T14:17:32+5:30
लसूडिया पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रीन फेल्ड शाळेतील विद्यार्थी हरेंद्र सिंह गुर्जर याने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.
इंदौर - लॉकडाऊनमध्ये खासगी शाळांकडून फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. कोरोना महामारीमुळे अद्यापही सरकारने शाळा आणि महाविद्यालयांना सुरू करण्यास परवानगी दिली नाही. तरीही, शाळा प्रशासनाकडून विद्यार्थी व पालकांना फीसाठी त्रस्त केलं जात आहे. शाळा प्रशासनाच्या याच त्रासाला कंटाळून दहावीतील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. इंदौरच्या लसूडिया पोलीस ठाणे परिक्षेत्रात ही धक्कादायक घटना घडली आहे.
लसूडिया पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रीन फेल्ड शाळेतील विद्यार्थी हरेंद्र सिंह गुर्जर याने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मृत हरेंद्रसिंह आपल्या भावोजींसोबत महालक्ष्मी नगर येथे राहात होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी फीसाठी दररोज तगादा लावला होता. तसेच, फी न भरल्यास दाखला नेण्याची धमकी दिली होती. शाळेच्या या दबावामुळे आणि दररोजच्या धमकीमुळेच हरेंद्रसिंहने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या भावोजींनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ताफा अडवत शाळांच्या मनमानी काराभाराची तक्रार दिली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री चौहान यांनी खासगी शाळांना इशारा दिला होता.