चंढीगड - देशात गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. हरयाणातील मनोहरलाल ठक्कर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील 4 थी अन् 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासंदर्भात हरयाणा सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोरोना नियम पाळून कॉलेज सुरू करण्यात आले आहेत.
देशातील विविध राज्यांत आता शाळा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सचा अहवाल आल्यावर घेण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. आता, हरयाणा सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हरयाणात 1 सप्टेंबरपासून सर्वच सरकारी आणि खासगी शाळेंमध्ये इयत्ता 4 थी आणि 5 वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विभागाने जारी केलेल्या एसओपींचे अनुपालन करून तुकड्या लावण्यात येतील. आई-वडिलांच्या परवानगीनंतरच या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळेल, असे ट्विट हरयाणा सरकारने केले आहे.
अहवाल आल्यानंतर निर्णय - टोपे
राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. साधारणपणे येत्या पाच ते सहा दिवसात निर्णय होईल. शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा होऊन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.