वाराणसी, दि. 10- विद्येचं मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळेला रात्री चक्क बार बनवलं गेल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. इतकंच नाही, तर त्या बारमध्ये बारबालांना नाचवून त्यांच्यावर पैसे उधळल्याचा प्रकारही घडला आहे. वाराणसीतील मिर्जापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मीरजापूरमधील एका प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाच्या दिवशी हा प्रकार घडला. रक्षाबंधनानिमित्त शाळेत सुट्टी असल्याने त्या दिवशी रात्री हा प्रकार घडल्याची माहिती मिळते आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी मिर्जापूरमधील तेतरिया गावामधील प्राथमिक शाळेला रात्री बार बनवण्यात आलं होतं. तेथे २० ते २४ लोकांनी एकत्र येऊन हा सर्व प्रकार केल्याचं समजतं आहे.या कार्यक्रमासाठी शाळेत बारबालांना बोलावण्यात आलं व त्यांच्यावर पैसे उधळण्यात आले. हा संपूर्ण प्रकार अज्ञात व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केली होती. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शाळेला पूर्णपणे बार बनविल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये बारबालांवर लोक पैसे उधळताना दिसत आहेत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत शिक्षण खात्यातील अधिकाऱ्याने मुख्याध्यापकाला जाब विचारला असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. रक्षाबंधनानिमित्त शाळेला सुट्टी असल्याने गावातील सरपंचाने शाळेची चावी मागितली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या, असं स्पष्टीकरण मुख्याध्यापकांनी दिलं आहे. या प्रकरणाचा सर्व तपास झाल्यानंतर याचा अहवाल शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपवला जाईल, असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं.