हैदराबाद : आंध्र प्रदेश सरकारने २ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यात शाळा पुन्हा सुरू होण्याच्या एक महिना आधीच विजयनगरममधील २७ शालेय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. वृत्तानुसार, विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्यांचे पालक काळजीत पडले असून त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने याआधी ५ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण, कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने आपला निर्णय पुढे ढकलत २ नोव्हेंबरपासून शाळा सुरु होतील, असे सांगितले.
मिळालेल्या वृत्तानुसार, विजयनगरममधील दोन जिल्हा परिषदेच्या हायस्कूलमधील नववी आणि दहावीचे जवळपास २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे विद्यार्थी आपले डाउट्स क्लीयर करण्यासाठी शाळांमध्ये जात होते. दरम्यान, सर्व खबरदारी शाळांमध्ये होती आणि विद्यार्थ्यांना हा संसर्ग इतर ठिकाणाहून झाला असावा, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले सर्व विद्यार्थी दांतीराजू मंडळाच्या दत्ती गावातील गेंट्याडा झेडपी हायस्कूलचे आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेतून कोरोनाची लागण झाली नाही. ज्यावेळी विद्यार्थी पहिल्यांदा शाळेत येतात. त्यावेळी त्यांची तपासणी केली जाते, असे शालेय शिक्षण आयुक्त व्ही. चिन्ना वीरभद्रुडु यांनी सांगितले. न्यू इंडियन एक्स्प्रेसला आयुक्तांनी सांगितले की, कदाचित विद्यार्थ्यांना कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग इतर ठिकाणाहून झाला असेल. शाळा बंद करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल.
दरम्यान, मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, 'सर्व विद्यार्थ्यांना ५ ऑक्टोबर रोजी 'जगन्नाथ विद्या कनुका' (जगन्स एजुकेशन गिफ्ट) वाटप केले जाईल. याअंतर्गत विद्यार्थ्यांना फ्रीबी योजनेंतर्गत गणवेशासह शाळेचे किट वाटप करण्यात येणार आहे.