पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमानमध्ये एका शिक्षक आणि एका क्लार्कवर शाळेतून तांदूळ आणि डाळ चोरल्याचा आरोप आहे. हे रेशन मुलांच्या मध्यान्ह भोजन योजनेसाठी आलं होतं. ही बाब बाहेर पसरताच ग्रामस्थ संतप्त झाले. लोकांनी या दोन्ही आरोपींना शाळेच्या बाहेर काढलं आणि गेटला कुलूप लावलं. ग्रामस्थांचा विरोध पाहून स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाचे आश्वासन देऊन प्रकरण शांत केलं आहे.
मेमारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गापूर गावात असलेल्या मोहिनी मोहन बसू शाळेशी संबंधित ही घटना आहे. गेल्या शनिवारी शाळा सुटल्यानंतर शिक्षक आणि क्लार्क शेख सिराज हे त्यांच्या टाटा सुमो कारमधून मध्यान्ह भोजनाच्या तांदूळ आणि डाळीची 10 पोती गुपचूप घेऊन जात असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. तेव्हा एका व्यक्तीने त्यांना रंगेहाथ पकडलं.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्या व्यक्तीने दोघांना त्यांच्या कारमध्ये काय आहे असे विचारले तेव्हा ते घाबरले. शिक्षक आणि क्लार्क त्याचे पाय धरून माफी मागू लागले. अधिक लोक जमा झाल्यावर त्यांनी मध्यान्ह भोजनाची चोरी केल्याची कबुली दिली. प्रचंड विरोधानंतर धान्य पुन्हा शाळेत ठेवावं लागलं.
ही बातमी पसरताच परिसरातील नागरिक संतप्त झाले. कारण, त्या दिवशी शाळेला सुट्टी होती आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता. त्यामुळे सोमवारी गदारोळ झाला. शाळा सुरू होताच संपूर्ण गावातील लोकांनी शाळेबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यांनी शाळेच्या गेटला कुलूप लावून शिक्षक व क्लार्कला हाकलून दिले. त्यानंतर आरोपींवर कारवाईची मागणी करत ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाचा घेरावही केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.