वाराणसी - नुकतेच लग्न झालेल्या एका नवरदेवाला पोलिसांनी विना हेल्मेट गाडी चालविताना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरच त्याची शाळा घेऊन त्याला वाहतुकीचे धडेही दिले.
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे संजय नावाच्या नवरदेवासोबत ही घटना घडली. त्याने चारचौघांसारखेच लग्न केले होते. मात्र नवरीला घरी आणल्यानंतर शेरवानी घालून त्याने आपली बाईक काढली आणि पूजा करण्यासाठी तिला आजोळी आणले. त्यानंतर गंगापूजनासाठी ते घरी रवाना झाले. दरम्यान शहर पोलिसांनी बुधवारी वाहतूक महिना या उपक्रमांतर्गत हेल्मेट-सीट बेल्ट डे मोहीम सुरू केली होती.वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सुरेश चंद्र रावत यांची नजर बाईकवरून जाणाऱ्या नवरदेवावर पडली. त्यावेळी त्यांनी संजयला रोखले.
त्यानंतर तिथेच असलेल्या एसएसपी आरके भारद्वाज यांनी संजयला विनाहेल्मेट गाडी चालवण्याबाबत धडे देण्यास सुरूवात केली. यावेळी आरके भारद्वाज यांनी नवरदेव लाजत असल्याचे पाहून त्याला चहाही पाजला.
पोलिसांनी त्याला सांगितले, की मात्या-पित्यासोबत आता त्याच्यावर पत्नीचीही जबाबदारी आली आहे. त्यानंतर भारद्वाज यांनी संजयला नव्या संसारासाठी शुभेच्छा दिल्या आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्लाही दिला.
गेल्या महिन्याभरात 18 लाख रुपयांचे चलन कापण्यात आले तर या महिन्यात 32 लाख रुपयांचे चलन कापण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सुरेश चंद्र रावत यांनी दिली.