चंदीगड- पंजाबमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीवर 25 ऑक्टोबर रोजी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या मुलीचा फजिलका गावात रविवारी मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही तसंत तिच्या आई-वडिलांनी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्येही नेलं नाही. मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने समाजात नाव खराब होईल, या भीतीने त्यांनी पीडित मुलीवर घरीच उपचार केले. हॉस्पिटलमधून उपचार न मिळाल्याने अती रक्तस्त्राव होऊन, त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला.
पीडित मुलगी सरकारी शाळेत इयत्ता सातवीत शिकणारी होती. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर तिला अडवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या कुटुंबियांनी त्यानंतर तिला घरी नेलं. मुलीला घरी नेऊन तेथेच तिच्यावर उपचार करण्यात आले. पीडित मुलीबरोबर घडलेली घटना गावातील एका व्यक्तीने पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या घरी धाव घेतली. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, असं जलालबादचे डीएसपी अमरजीत सिंग यांनी सांगितलं.
मुलीवर बलात्कार झाल्याचं लोकांना समजल्यावर आपलं नाव खराब होईल, असं तिच्या कुटुंबीयांचं मत होतं. पीडित मुलीला तत्काळ उपचाराची गरज होती. पण त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही, असंही सिंग यांनी सांगितली. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एकालाही अजून अटक करण्यात आलेली नाही.
पीडित मुलीच्या आईने एका आरोपीला ओळखल्याचं समजतं आहे. तो पीडित मुलीच्या शाळेतच शिकणारा असल्याचं समजतं आहे. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख सांगण्यात आलेली नाही. आरोपींचं वय नेमकं किती आहे हे समजलं नाही, पण तो आरोपी फरार आहे. इतर दोघांची अजून ओळख पटलेली नसून ते मुख्य आरोपीचे मित्र असण्याची शक्यता आहे, असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी तीन अज्ञातांविरोधात जलालबाद सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.