श्रीनगर : काश्मिरात गेल्या २४ तासांत अज्ञात लोकांनी तीन शाळा जाळल्या. या घटनांनी खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शाळांभोवतीची सुरक्षाव्यवस्था आवळण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या नूरबाग भागातील शाळेला अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी पहाटे आग लावली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. आग आणि अग्निशमन कार्य यामुळे शाळेच्या इमारतीची हानी झाली, असेही हा अधिकारी म्हणाला. दुसऱ्या एका घटनेत समाजकंटकांनी अनंतनाग जिल्ह्यातील शासकीय उच्च माध्यमिक शाळा जाळण्याचा प्रयत्न केला. तथापि, अग्निशमन जवानांनी वेळीच धाव घेतल्यामुळे शाळा भस्मसात होण्यापासून वाचली. आगीमुळे एका खिडकीचे नुकसान झाले. बांदीपुरा जिल्ह्यातील सद्रुकोटे बाला येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या इमारतीत सोमवारी रात्री आग भडकली. अग्निशमन दलांनी आगीवर नियंत्रण मिळवून मोठी हानी रोखली. या घटनेमागे समाजकंटकांचा हात असल्याचा संशय आहे. जाळपोळीच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शाळांच्या इमारतीभोवतीची गस्त वाढविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)बोर्डाची परीक्षा पुढील महिन्यातराज्यातील शाळा जुलैपासून बंद असूनही राज्य सरकारने वार्षिक बोर्ड परीक्षा पुढच्या महिन्यात घेण्याची घोषणा केली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वनी सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत मारला गेल्यापासून खोऱ्यातील शाळा बंद आहेत. परीक्षा घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली. यशवंत सिन्हा यांनी केली गिलानींशी चर्चा श्रीनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने मंगळवारी कट्टरपंथी हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्याशी श्रीनगरमध्ये चर्चा केली. काश्मिरात जुलैमध्ये हिज्बुलचा अतिरेकी बुऱ्हाण वानी मारला गेल्यानंतर राज्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेली कोंडी संपविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारताचा पलटवार; पाकचे तीन ठारजम्मू : काश्मीर खोऱ्यातील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील नियंत्रण रेषेलगत शस्त्रबंदीचे उल्लंघन करून पाकिस्तानी फौजांनी उखळी तोफांच्या माऱ्यासोबत बॉम्ब डागत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. सीमेवर सजग असलेल्या भारतीय जवानांनी तात्काळ केलेल्या पलटवारात पाकिस्तानचे २ ते ३ सैनिक ठार झाले. आर.एस. पुरा भागात सीमेपलीकडून करण्यात आलेल्या तोफमाऱ्यात एकाच कुटुंबातील सहा महिला जखमी झाल्या आहेत. नौशेरा भागात सकाळी १० वाजेपासून दोन्ही बाजूंनी सुरू झालेली चकमक अजूनही चालू आहे. पाकिस्तानच्या बाजूने करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही तात्काळ तडाखेबाज उत्तर दिले. पाकच्या उलट्या बोंबाइस्लामाबाद : भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. पाकने भारताच्या इस्लामाबादेतील उप उच्चायुक्तांना पाचारण करून ताबा रेषेवर भारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत निषेध नोंदविला. भारतीय सुरक्षा दलांनी २३ आणि २४ आॅक्टोबर रोजी केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एका बालिकेसह दोन ठार, तर सहा जण जखमी झाले होते. याबाबत आम्ही भारताकडे तीव्र निषेध नोंदविला, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ‘शस्त्रसंधी कराराला औपचारिक स्वरूप द्यावे’नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर जवळपास दररोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कराराला औपचारिक स्वरूप देण्याची गरज असल्याचे मत मांडले. येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दोन्ही देशांनी २००३ च्या शस्त्रसंधी कराराला औपचारिक स्वरूप द्यावे.
काश्मिरात शाळा जाळल्या
By admin | Published: October 26, 2016 2:04 AM