Arunachal Pradesh Eye Infection: महाराष्ट्रात सध्या तुफान पाऊस कोसळत आहे. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याचेही चित्र आहे. पावसाच्या तडाख्यामुळे कार्यालयांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात येत आहे, तर विविध जिल्ह्यातील अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात येत आहे. मात्र अरुणाचल प्रदेशातील लाँगडिंग जिल्हा प्रशासनाने डोळ्यांच्या संसर्गाच्या कारणामुळे शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
डोळे येणे म्हणजेच नेत्रसंक्रमणाच्या आजाराच्या प्रादुर्भावानंतर कानुबारी उपविभागातील शाळा तात्पुरत्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कानुबारी आणि लॉन्नू शैक्षणिक विकास गटांतर्गत असलेल्या सर्व शाळांच्या प्रमुखांना तात्पुरत्या स्वरुपात २९ तारखेपर्यंत शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. लोंगडिंगचे उपायुक्त (DC) लेगो यांनी एका परिपत्रकात म्हटले आहे की, डॉक्टरांच्या मते हा रोग अत्यंत संसर्गजन्य आहे आणि एका संक्रमित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो.
नक्की काय आहे आजार?
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाची होणारी आग हा विविध विषाणूंमुळे होणारा डोळ्यांचा संसर्ग आहे. या आजारामुळे डोळ्यात लालसरपणा, खाज सुटणे, डोळ्याची जळजळ होणे, अश्रू येणे, नैराश्य जाणवणे असे होते. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यातील स्राव, दूषित वस्तू किंवा श्वासोच्छवासातील थेंब यांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्काद्वारे हा संसर्ग सहज पसरू शकतो. आरोग्य अधिकारी वारंवार हात धुण्याची, डोळ्यांना स्पर्श न करणे, वैयक्तिक स्वच्छता आणि संक्रमित व्यक्ती बरे होईपर्यंत त्यांना वेगळे ठेवण्याची शिफारस करत आहेत. अशाप्रकारेच या रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो.
दरम्यान, लॉंगडिंग डीडीएसई ताजे जिलेन यांनी सांगितले की, कानुबारी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) यांच्या अहवालानंतर शाळा बंद करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, किती विद्यार्थ्यांना या आजाराची लागण झाली आहे याची आकडेवारी आमच्याकडे नाही. पश्चिम सियांग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये डोळ्याच्या संक्रमणाचा आजार पसरल्याचे सांगण्यात येत आहे.