नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील थंडी सर्वांना माहिती आहे, कडाक्याच्या थंडीमुळे आणि धुक्यांमुळे दिल्लीत सकाळी घराबाहेर पडणेही कठीण होऊन जाते. कडाक्याच्या याच थंडीमुळे नोएडातील गौतम नगर आणि ग्रेटर नोएडा येथील सर्वच शाळांना १४ जानेवारीपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. इयत्ता ८ वी पर्यंतच्या सर्वच शाळा १५ जानेवारीपासूनच नियमितपणे सुरू होणार आहेत. जिल्हा शिक्षणाधिकारी राहुल पवार यांनी यांसदर्भात आदेश जारी केला आहे.
शासनाच्या आदेशानुसार ग्रेटर नोएडा आणि गौतम नगर भागातील राज्य बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि इतरद्वारे मान्यताप्राप्त सर्वच शाळांना १४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यांमुळे जिल्हाधिकारी मनिष शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार जनपदमधील कार्यरत सर्वच शाळांना १४ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा व कॉलेजच्या वेळात बदल करण्यात आला आहे. जिल्हा विद्यालय निरीक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, या काळात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत भरणार आहे.
दरम्यान, पश्चिम उत्तर प्रदेशातील तापमान काही ठिकाणी ९ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. तसेच, पुढील ९ ते १३ तारखेर्यंत हे तापमान याच अंदाजात राहिल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे, येथील जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी आणि कॉलेजच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ३ ते ६ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती.