श्रीनगर, दि. 1 - सुरक्षा रक्षकांच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू दुजानाचा खात्मा झालेला आहे. अबू दुजानाच्या खात्म्यानंतर खबरदारी म्हणून काश्मीर खो-यामध्ये मंगळवारी शाळा व कॉलेज बंद करण्यात आले. शाळा-कॉलेजांसोबत मोबाइल इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुजानाच्या खात्म्यानंतर काही लोकांकडून काश्मीरच्या काही ठिकाणी दगडफेक व घोषणाबाजीच्याही घटना समोर आल्या आहे. दरम्यान, आता येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात हिंसाचार उफाळून येऊ नये, यासाठी शाळा-कॉलेज व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, अबु दुजानाच्या खात्म्यामुळे भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले. अबू दुजाना भारतीय लष्कराच्या रडारवर होता. अखेर त्याला कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. अबू दुजाना दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता. विशेष म्हणजे दुजानाचा खात्मा होण्यात त्याच्या मोबाइल फोनची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी पळून जाण्यात दुजानाला यश आले होते. परंतु पसार होत असताना त्याचा मोबाइल गाडीत राहिला. त्यामुळे सुरक्षा जवानांच्या हाती दहशतवादी हालचालींबाबत मोठा पुरावा लागला. या मोबाइलच्या आधारे लष्करानं संपर्क क्रमांक ट्रॅक करून दहशतवादी चळवळीची माहिती मिळवली. सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. मंगळवारी जेव्हा तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता, त्यावेळी सुरक्षा दलाला त्याची माहिती मिळाली आणि लष्करानं पुलवामामधल्या बाकरीपोरा येथे त्याला चहूबाजूंनी घेरलं. त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दुजाना ज्या घरात थांबला होता, तिथून जवळपास 4 तास त्यानं एकदाही गोळीबार केला नाही. लष्करानं त्या घरावर रॉकेट लाँचर सोडले. त्याच वेळी अबू दुजानासह आरिफ ललहारीचाही खात्मा झाला.
सीआरपीएफ 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीच्या टीमनं मिळून ही कारवाई केली होती. तत्पूर्वी 19 जुलैलासुद्धा लष्करानं अबू दुजानाला घेरलं होतं. पुलवामातल्या बंदेरपुरा गावात लष्कर आणि एसओजीच्या जवानांनी अबू दुजानाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र दुजाना त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी ठरला होता. भारतीय लष्कराने अबू दुजानावर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. दरम्यान, काश्मीर खो-यात लष्करानं ऑपरेशन ऑलआऊट राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लष्करानं वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशनही राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं आतापर्यंत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
115 active terrorists in south Kashmir,out of which 10-12 are foreign terrorists & rest local terrorists: Major Gen BS Raju,GOC Victor Force pic.twitter.com/3YdKiPwuNr
— ANI (@ANI_news) August 1, 2017