एस. के. गुप्तानवी दिल्ली : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) बोर्ड परीक्षांची अंतिम तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ४ जानेवारी, २०२१ पासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह केला आहे.
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव गैरी अराथून यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही सगळी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करावा. मुख्य निवडणूक आयुक्तांनाही आवाहन करण्यात आले आहे की, राज्यांत येत्या एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखांची माहिती द्यावी. त्यातून बोर्ड परीक्षांमध्ये होणारी अडचण टाळता येईल.
गैरी अराथून म्हणाले की, कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून देशातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मोजक्या राज्यांनी त्या पुन्हा सुरू केल्या. हिमाचल प्रदेशने शाळा, महाविद्यालयांसह सगळ्या शैक्षणिक संस्था ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली होती. दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, जोपर्यंत कोरोना लस येत नाही तोपर्यंत राज्यात सगळ्या शाळा बंद राहतील. गैरी अराथून म्हणाले की, जर शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जात असेल तर सुरक्षा नियमांचे आणि सरकारने घालून दिलेल्या एसओपीचे पालन करावे लागेल. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर वेळेचा उपयोग प्रॅक्टिकल वर्क्स, प्रोजेक्ट वर्क्स आणि शंका निरसन सत्र आदींसाठी केला जाईल, असेही ते म्हणाले.