नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच, दिल्लीत सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत, अनावश्यक बाहेर पडा धोकादायक आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील, असे निर्देश दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व शाळा ३१ ऑक्टोबर बंद राहतील असे मनीष सिसोदिया यांनी रविवारी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाज यांनी म्हटले आहे की, पालक म्हणून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजते. सध्या मुलांच्या आरोग्यासंदर्भात कोणतीही जोखीम घेणे योग्य होणार नाही, असे ट्विट मनीष सिसोदिया यांनी केले आहे.
यापूर्वी दिल्ली सरकारने ५ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शाळा सुरु होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने पुन्हा आपला निर्णय बदलला आहे. दिल्लीतील सरकारीसह कॉर्पोरेशन, एनडीएमसी, दिल्ली कॅन्टशी संलग्न आणि खासगी शाळांना बंदीचा आदेश लागू राहील. तसेच, आता ३१ऑक्टोबरनंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने पाचव्या टप्प्यात ५.० अनलॉक प्रक्रियेसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानंतर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थानसह विविध राज्यांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना केली आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वानुसार असे म्हटले आहे की, शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी दबाव आणला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगीदेखील सर्वात महत्वाची मानली गेली आहे. याशिवाय, शाळा पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू ठेवतील.
एवढेच नाही तर केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की, १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय राज्य सरकार आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारीनुसार घेईल. तसेच, राज्य सरकार कोरोना संसर्गाच्या घटनांचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेईल. त्यांच्यावर कोणताही दबाव नसणार आहे.
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५८२९ नवे रुग्णरविवारी (४ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५८२९ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ९४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६५ लाख ४९ हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.